Friday, February 3, 2012

ब्राह्मण जात पंचायत


इंडियाचे भारत करणे हे ब्राह्मण समाजाचे पहिले कर्तव्य आहे. स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांचा सन्मान नष्ट होण्याचे आणि ब्राह्मणांच्या अवनतीचे मुख़्य कारण भारताचा इंडिया झाला आहे. इंडियामुळे भारताचा ईतिहास पुसला गेला आणि ब्राह्मणाना तुडविण्याचे बुद्धिजीवींना डावलल्याचे प्रकारही तेव्हापासून सुरु झाले. त्याचे दुष्परिणाम आजही दिसत आहेत.
नव्या पिढीला संगणकाबरोबरच संध्या ही शिकवा.
जोपर्यंत ब्राह्मनांचे कर्तृत्व आहे तोपर्यंत या राष्ट्राचा धर्म व संस्कृती कधीच मरणार नाही. हिंदुना एकत्र आणण्याचे उत्तरदायित्वही याच समाजाकडे आहे.
भारतात ब्राह्मण प्राचीन काळापासून अल्पसंख्यच होते. अनेक वैध व अवैध मार्ग अवलंबुन ब्राह्मणांनी बहुजनांवर हजारो वर्षे वर्चस्व गाजविले. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणांना असुरक्षित वाटू लागले. त्यावर उपाय म्हणून काही ब्राह्मणांनी एकत्र येऊन ब्राह्मण महासंघाची स्थापणा केली. या ब्राह्मण महासंघाच्या वतीने दरवर्षी ब्राह्मण अधिवेशने होत असतात. या वर्षिचे अखिल भारतीय ब्राह्मण अधिवेशन नुकतेच पुण्यात झाले. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शंकर अभ्यंकर यांनी वरील प्रमाणे ब्राह्मण जातीचे दुखणे व्यक्त केले.
अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण सभेचे दोन दिवसीय अधिवेशन दोन वर्षांपूर्वी घेतले होते. त्या अधिवेशनामध्ये लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी बीज भाषण केले होते. त्या भाषणामुळे त्यांना धक्काबुक्की झाली होती. हे वृत्त सर्वच वृत्तपत्रांनी छापले व त्या कृत्याचा निषेध ही केला गेला होता.
त्या भाषणात केतकरांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. केतकरांच्या कथनामधून ब्राह्मण जाती अंतर्गत चाललेले विविध अंत:प्रवाह प्रतिबिंबित होतात. त्यात त्यांना गोमांस भक्षणापासून ते आंतरधर्मीय विवाह, परदेशगमन, पाश्चिमात्य संस्कृतीशी लगट हे सर्व अगदी विस्ताराने मांडले आणि हेच कळीचे मूळ ठरले.
ब्राह्मणांच्या अधिवेशनामध्ये ब्राह्मणांची वाहवा व्हावी, ब्राह्माणांच्या यशाचे गुणगान व्हावे, विविध क्षेत्रातील यशस्वीतेचे कौतुक व्हावे, इतरांपेक्षा ब्राह्मण जात आजही श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा जाहीर व्हावे ही अपेक्षा असतेच. या अपेक्षेने खरेतर क्षोतृवर्ग अभिमानाने किंवा गर्वानेच अगदी वेळात वेळ काढून आलेला असताना त्यांच्यासमोर ब्राह्मणांची दुसरी बाजू मांडली जावी हे सर्व अनपेक्षित होते. जात पंचायत बोलाविली होती ती आपले श्रेष्ठत्व ओरडून सांगण्यासाठी आणि येथे एक ब्राह्मण जातीची उणीदुणी काढतो हे पचनी पडने नव्हते.
कुमार केतकर ब्राह्मणांची व्याख्या करताना म्हणाले, जात जन्माने ठरु नये, जो जात पाळत नाही, भेदाभेद करीत नाही, कुणी उच्च व कुणी नीच असे मानत नाही, कुणाला कमी लेखत नाही, कुणाला वरचे मानत नाही, जो ज्ञानमार्गाला स्वीकारतो, जो ज्ञानप्रसार करतो, जो जे वांछील तो ते लाहो असे मनापासून म्हणतो. अवघ्या विश्वाची चिंता वाहतो, आणि हे विश्व दुरितांचे तिमीर जाओ बदलण्याचा प्रयत्न करतो तो ब्राह्मण अशी व्याख्या आपण करुया. मूळ ब्राह्मण संज्ञेची व्याख्या तीच होती. ती व्याख्याच भ्रष्ट झाल्यामुळे जात जन्मावरुन ठरु लागली. आणि ब्राह्मण कुळात जन्म घेणारा तो ब्राह्मण अशी संकुचित मांडणी रुढ झाली. ब्रह्माचा, विश्वाचा, विश्वजन्माचा, विश्वातांचा, मनाचा, समाजाचा अखंड शोध घेणारा ज्ञानयोगी म्हणजे ब्राह्मण असे आपण मनापासून स्वीकारले की आपल्याला सॉक्रेटिस आणि बट्राड रसेल, येशू आणि बुद्ध ज्ञानयोगी व सेवायोगी भासू लागतील.
असा दृष्टीकोन घेतला कि लक्षात येईल की ज्ञानेश्वर या ब्राह्मणाला वाळीत टाकणारे ब्राह्मण की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई हे ब्राह्मण! तुकारामाला जात चिकटवून त्या तुक्याच्या अभंगातले वैश्विक ज्ञान कमी लेखणारे ब्राह्मण की तुकाराम ब्राह्मण? ब्राह्मण ही जात आहे असे म्हणणेच हे अब्राह्मणी आहे. ती जन्माने ठरते असे म्हणणे म्हणजे ज्ञानमार्गी वृत्तीचा अपमान करणे आहे.
केतकरांचे हे विचार वाचले कि कुणाचेही मनोरंजन होईल. कारण, जात जन्मानेच ठरते जो जात पाहतो, भेदाभेद करतो, उच्चनीच असा भेदभाव करतो, इतरांना कमी लेखतो, स्वत:ला सर्वोच्च मानतो, जो शब्द प्रामण्याचा स्वीकार करतो, ठेवीले अनंते तैसेची राहावे असे दुस-यांना शिकवितो, अवघ्या विश्वाच्या शोषणाची समाजव्यवस्था निर्माण करतो, आणि दुरितांचे तिमिर वाढविण्यासाठी देव, देवता, धर्म, धर्मग्रंथ, प्रेषित, बाबा, बुवा, महाराज, नशीब, अंधश्रद्धा, ज्योतिष अशा सर्व खोटानाट्या गोष्टींचा प्रचार प्रसार करतो तोच खरा ब्राह्मण अशी ब्राह्मणांची गेल्या हजारो वर्षाची ओळख आहे.
बहुजन समाजाला नाडून त्यांचे सर्वांगाने शोषण करणारी जात म्हणजे ब्राह्मण जात, हे बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशनाला आलेल्या ब्राह्मणांना ठाऊक होते. म्हणूनच त्या वास्तवाच्या उलट जेव्हा कुमार केतकरांनी आदर्शवादी परुंतु वास्तव नसलेली भूमिका घेतली तेव्हा त्यांना फटके पडणार हे निश्चितच होते.
ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तीन्ही लोकी श्रेष्ठ. हा ब्राह्मण धर्माचा मूलमंत्र आहे. रवी शास्त्रीने गोमांस खाल्ले किंवा काही पुणेरी तरुणींनी पाकी पुरुषांशी लग्न केले तरी त्यामुळे गोमांसाला सदगती प्राप्त होते व पुणेरी कन्यकांमुळे कदाचित पाकी तरुणांना पुण्य लाभते असेल परंतु ब्राह्मण्याला मात्र काळीमा लागत नाही हीच तर ब्राह्मण्यांची खासियत आहे. सौ चुहे खाके भी ये बिल्ली याने की ब्राह्मण पाक रहता है!
तेराव्या शतकात विठ्ठल कुलकर्णी उपरती झाली होती. संन्यास मार्ग सोडून तो बिचारा संसारात रममाण झाला. त्याच्या संसाराला चार गोमटी फळे आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई. परंतु संन्याशाने संसार केला व मुलांनाही जन्म दिला हे ब्राह्मण्यांच्या कक्षेत बसत नाही असे वाटल्यामुळे विठ्ठल कुलकर्ण्याला बहिष्कृत करण्यात आले. त्याने आत्महत्या केली. पुढे त्याच्या चारही मुलांना बहिष्कृत जीवन जगावे लागले. या विरोधात त्या चारही मुलांनी जंग जंग पछाडले.
ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर याने ब्राह्मणांची, ब्राह्मण पंडितांची दारे ठोठावली. ब्राह्मणसभामधून दाद मागितली ती कशासाठी?
आपले ब्राह्मणत्व परत मिळावेच म्हणूणच ना? ज्ञानियाचा राजा झाला तरी तो ब्राह्मण नसेल तर मग सगळेच बुडाले! म्हणून सा-या जगाला ज्ञानेश्वरीतून उपदेश पाजणा-या या ज्ञानियाच्या राजालाही शेवटी आपले जन्मजात ब्राह्मणत्व परत मिळावे म्हणून आयुष्यभर झगडावे लागले. ज्ञानमार्गातून ब्राह्मणत्व मिळाले तरी जन्मजात ब्राह्मणत्व श्रेष्ठ असते हे ज्ञानियाने स्वत:च्या कृतीने सिद्ध करुन आपणही त्या जातीव्यवस्थेचे समर्थक आहोत हेच सिद्ध करण्याचा खटाटोप आयुष्यभर केला नाही काय? अर्थात जात पंचायतीने त्यांना ब्राह्मणत्व नाकारले ते नाकारलेच.
त्यामुळेच जो जे वांछील तो ते लाहो असे ज्ञानेश्वराने कितीही जोराने ओरडून सांगितले तरी एखाद्या महाराने, मांगाने वा चांभाराने ब्राह्मण जात मागितली असती तर ती त्याला मिळाली असती का? ती तर खुद्द ज्ञानेशाला मिळाली नाही! गेल्या सातशे आठशे वर्षाची ही शब्दांची आतशबाजी जीवापड जपणारी जातीव्यवस्था आता कुमार केतकर तोडायला चालले आहेत ती कशी?
ते सुद्धा ब्राह्मण या शब्दाची नवी व्याख्या करू इच्छितात. परंतु व्याख्या बदलली तरी आश्य बदलेलेच असे नाही. आणि आशय बदलला तरी ढाचा बदलत नाही, वास्तव बदलत नाही.
केतकर ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मणसभा या सर्वांनाच नाकारु का शकत नाहीत? कारण कुठेतरी त्यांच्याही मनात सुप्तपणे ब्राह्मण लपलेले असते. पेरलेले असते. नकारात क्रांतीची बीजे असतात.
ज्यांना क्रांती करायची असतेते, जे जे अकुशल असते ते ते नाकारताना पळवाटा शोधित नाहीत.
ज्ञानेश्वर ते कुमार केतकर, अभ्यंकर हा जवळ जवळ साडेसातशे वर्षांचा काळ! या एवढ्या काळात जगात खुप उलथापालथी झाल्या. विजयनगरचे यादवांचे राज्य गेले, यादवकालीन मराठी गेले, आदिलशाही आली गेली, निजामशाही गेली, बादशाही आली गेली, पेशवाई गळाली, ब्रिटीशही गेले परंतु..
ब्राह्मण्य अजून तसेच आहे म्हणून जातीव्यवस्था तशीच आहे.
ज्ञानेस्वराने रेड्याच्या तोंडून वेद वदविले. वेदांचा उच्चार शुद्र व अतिशुद्रानी करू नये, असा मनुस्मृतीचा ब्राह्मणी दंडक! त्यामुळे वेद वदविण्यासाही महार, मांग, चांभार, भंगी, आदिवासी तर जाऊ द्याच पण तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सुतार ईत्यादीपैकी कोणीच ज्ञानेश्वराला चालला नाही. एवढेच कशाला सो कॉल्ड क्षत्रिय मराठ्याला (शहाण्यव कुळी) सुद्धा ज्ञानेश्वराने नाकारले. त्याने रेड्याला पकडले! (आता वेद केवळ रेड्याच्याच लायकीचे आहेत असे ज्ञानेश्वराला सुचवायचे असेल तर गोष्ट वेगळी)
जाती निर्मुलन व जाती व्यवस्थेचे उच्चाटन करुन समाताधिष्ठीत समाजाची निर्मिती करणे ही आज काळाची गरज आहे. परंतु जाती उत्थानाच्या कामाला विशेष वेग आला आहे. आपापली जात इतरांपेक्षा श्रेष्ठ कशी हे सिद्ध करण्याचा खटाटोप सुरु आहे. आतापर्यंत कुठल्या जाती श्रेष्ठ झाल्या ठाऊक नाही. पण ज्ञानेश्वराने रेड्याच्या जातीचे उत्थान केले व त्याला ब्राह्मणत्व देऊ केले हे मात्र नाकारता येत नाही. आता केतकर आणि अभ्यंकर आणि त्यांचे रेडे कुणाकुणालाअ जाती श्रेष्ठत्व देतात हे पाहणे एवढेच आपल्या हाती आहे! ब्राह्मण जात पंचायतीकडून जास्त अपेक्षा करणे उचित नाही!
इंडिया दॅट इज भारत असे ठणकाऊन सांगणार-या भारतीय संविधानाने या देशातल्या तमाम वंचिताना, दुखि:ताना, शोषिताना, सामाजिक, आर्थिक, व राजकीय न्याय अभिव्यक्ती, श्रद्धाव उपासना यांचे स्वातंत्र्य, संधी व सन्मानाची समानता आणि राष्ट्राचे ऎक्य व एकात्मता व व्यक्तिची प्रतिष्ठा साधणारे बंधुत्व यांची अमुल्य देणगी व हमी दिल्यापासून म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून ब्राह्मणी अहंगंडाला, वर्चस्वाला, जात्यंधतेला, धर्मांधतेला जबरदस्त धक्का पोहचला व ब्राह्मणी व्यवस्था खिळखिळी होऊन मृत्युच्या उंबरठ्यात उभी आहे हे मात्र यातून स्पष्ट जाणवत राहते!

प्रा. प्रेमरत्न चौकेकर